लवकरच पुणे शहर विकास आराखडा

devendra-fadnvis
मुंबई : सरकारने १५ दिवसांतच राज्यातील २५ शहरांच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली असून आता पुणे आणि कल्याण या दोनच शहरांचे आराखडे प्रलंबित असून त्यापैकी कल्याणचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येईल. पुणे शहर विकास आराखड्याबाबत मतैक्य घडवून तोही मार्गी लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रशासनात अधिक पारदर्शकता यावी यासाठी माहिती अधिकाराखाली उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना ई-सेवेद्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उसासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर केला पाहिजे त्या दृष्टीने सरकार, साखर कारखाने व शेतकरी यांच्या सहकार्याने योजना राबविण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची दिशा स्पष्ट केली. स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख प्रशासनाला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर डिजिटल महाराष्ट्र हे अभियान आपण सुरू केले आहे. शासनाच्या सर्व सेवा माझ सरकार या वेबपोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याच बरोबर नागरिकांना देण्यात येणा-या सुविधा ई-सेवेच्या माध्यमातून देणे अनिवार्य करण्यात येईल. सुविधा कधीपासून सुरू करावयाची याची तारीखही महिनाभरात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment