मेलबर्नमध्ये भारताची नामुष्की टळली

cricket
मेलबर्न : अखेर मेलबर्न कसोटी वाचवण्यात धोनीच्या टीम इंडियाने यश मिळवले असून कर्णधार धोनीने अश्विनच्या साथीने मेलबर्नवर टीम इंडियाची लाज राखली. ही कसोटी भारताने अनिर्णीत राखल्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आज आपला दुसरा डाव ९ बाद ३१८ धावांवर घोषित करुन भारताला विजयासाठी ३८४ धावांचे आव्हान दिले होते. शिखर धवन, लोकेश राहुल आणि मुरली विजय हे तीन फलंदाज केवळ १९ धावांतच माघारी परतले. त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने भारताची पडझड थांबवत ८५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

चहापानानंतर पहिल्याच चेंडूवर रायन हॅरिसने विराटला माघारी धाडून भारताचे कंबरडे मोडले. त्यानंतर आलेला पुजारा २१ धावांवर आणि रहाणे ४८ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद १०४ वरुन ६ बाद १४२ अशी केविलवाणी झाली होती. उरलेली अकरा षटके कर्णधार धोनी आणि अश्विनने खेळून कसोटी अनिर्णीत राखली.

Leave a Comment