कमी होणार राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची सुरक्षा

ajit
मुंबई – राज्यात नव्यानेच आलेल्या फडणवीस सरकारने एक धाडसी निर्णय घेतला असून त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली जाणार आहे. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उद्योगमंत्री नारायण राणे या काँग्रेस नेत्यांचा तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, आर.आर. पाटील यांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या संदर्भात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तेत नसलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कायम ठेवावी वा कमी करावी यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती. त्यात या नेत्यांना धोका होण्याची शक्यता किती आहे याचा आढावा घेण्यात आला तेव्हा त्यांना सत्तेत नसल्याने मोठा धोका नाही असा निष्कर्ष काढला गेला. परिणामी त्यांची सुरक्षा घटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे पोलिसांना अधिक पोलिसबळ उपलब्ध होणार आहे.

भविष्यात या नेत्यांना असलेला धोका वाढत असल्याचे लक्षात आले तर त्यांना पुन्हा पूर्वीसारखीच सुरक्षा दिली जाईल असेही सांगण्यात येत आहे. समितीने सुरक्षा कमी करण्याचा घेतलेला निर्णय अंतिम असून त्यासाठी अन्य कोणत्याही क्लिअरन्सेसची आवश्यकता नसल्याचेही सांगितले जात आहे. ज्या नेत्यांना यापूर्वी झेड प्लस अथवा झेड सुरक्षा होती ती कमी करून आता एक्स किंवा वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःसाठी झेड प्लस सुरक्षा घेण्यास यापूर्वीच नकार दिला आहे.

Leave a Comment