ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे शहीद ओंबळे यांना पुरस्कार

ombale
पुणे – मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबळे यांची ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या ओंकारेश्वर श्रीमंत चिमाजीआप्पा पेशवे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार येत्या एक जानेवारीला सायंकाळी सहा वाजता मंदिरातच प्रदान करण्यात येणार असून ओंबळे यांची मुलगी वैशाली हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे या वर्षीपासून महाराष्ट्रातील धाडसी, शूर आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओंकारेश्वर श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या सन्मानासाठी ओंबळे यांची निवड झाली आहे.

या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि ५१ हजार रुपये, असे असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस आयुक्त सतीश माथूर आणि उदयसिंह पेशवे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बालकवडे हे श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे यांचे कार्य आणि पराक्रम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Comment