मुंबई : पोलिसांनी आपले लक्ष नववर्ष स्वागतासाठी आयोजित ‘रेव्ह पार्टी’ त होणारे अमली पदार्थांचे सेवन लक्षात घेऊन अशा पार्टीवर केंद्रित केले असून मोठमोठी हॉटेल्स, रिसोर्टस् आणि पबमध्ये अशा पार्ट्या आयोजित केल्या जात असल्याने ही हॉटेल्स, रिसोर्टस् आणि पबवर पोलिसांची करडी नजर रहाणार आहे. सोबतच इंटरनेटवरील आमंत्रणे आणि मोबाइलवरून येणा-या ‘एसएमएस’ वरही पोलिसांचे लक्ष आहे.
रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर
मुंबई नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून दरवर्षी ‘थर्टीफस्र्ट’ च्या एका रात्रीत कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थाचे वितरण होते. तरुणपिढीला व्यसनाधीनतेकडे नेणा-या अंमली पदार्थाच्या वितरकांकडून पंचतारांकित हॉटेल्सपासून साध्या रिसॉट्र्पर्यंत खास पार्टी ठेवल्या जातात. ‘फिल हाय’मध्ये नेण्यासाठी या पार्टीत कोकेन, केटामाईन आणि टूसीबीसारखे अंमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुणपिढी लाखो रुपयांची उधळण करीत असते. या पार्टीत होणा-या अंमली पदार्थाच्या वितरणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी या पार्टीवर करडी नजर ठेवली आहे. पार्टीत होणा-या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यांचे खबरे हॉटेल्स, पब आणि रिसॉर्टमध्ये तैनात केले आहेत. त्यांच्याकडे पीनहोल कॅमेरेही असणार आहेत.