भ्रष्टाचार कमी झाल्यास घरे होतील स्वस्त!

pravin
पंढरपूर – लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मुंबई महापालिकेत सुरु असलेल्या भीषण भ्रष्टाचारास आला घातला तर मुंबईत ज्या इमारती उभ्या राहात आहेत त्यांचा भाव प्रति चौरस फूट थेट पाचशे रुपयांनी कमी होईल व घरे स्वस्त होतील, असे वक्तव्य येथे केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका खासदाराने आपल्याला ही माहिती दिल्याचे प्रवीण दीक्षित यांनी हे वक्तव्य करताना म्हटल्यामुळे हे मत प्रवीण दीक्षित यांचे व्यक्तिगत मत नसून त्यांनी त्यांच्यापर्यंत एका खासदाराने पोहोचवलेली माहिती सांगितली असल्याचे मानले जात आहे. तरीदेखील दीक्षित यांच्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख, महासंचालक प्रवीण दीक्षित हे पंढरपुरात होते. तेथील पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या जाहीर कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. आपल्या खात्याबाबत थोडीफार माहिती देताना दीक्षित यांनी थेट मुंबई महापालिकेशी संबंधित वक्तव्य केले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास,`कालच माझ्याकडे एक खासदार आले होते. ते सांगत होते की,`मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार इतका भीषण आहे की, ज्याचे नाव ते. तो जर कमी होऊ शकला तर मुंबईत ज्या इमारती बांधल्या जात आहेत त्यांचे दर प्रति चौरस फूटाला पाचशे रुपयांनी कमी होतील. केवळ मुंबईच नव्हे तर पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर सर्वत्र हेच चित्र आहे’.

Leave a Comment