दुस-या दिवसअखेर भारताच्या एक बाद १०८ धावा

vijay
मेलबर्न – पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या ५३० या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने दुस-या दिवसअखेर एक गडी गमावून १०८ धावा केल्या आहेत. भारतीय डावाचे वैशिष्ट्ये राहिले सलामीवीर मुरली विजयने झळकावलेले अर्धशतक.

मैदानावर विजय (५५) आणि चेतेश्वर पूजाराची (२५) ही जोडी असून, भारताने आपला पहिला गड़ी सलामीवीर शिखर धवनच्या रुपाने गमावला. संघाचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर धवन २८ धावांवर असताना हॅरीसने त्याला स्मिथकडे झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर मैदानावर आलेल्या पूजाराने आणखी पडझड होऊ दिली नाही. तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजी समर्थपणे खेळून काढण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. तत्पूर्वी दुस-या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवले.

पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवू न देणा-या भारतीय गोलंदाजांनी दुस-या दिवशी सुमार कामगिरी केली. शनिवारी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत खो-याने धावा लुटल्या. कर्णधार स्मिथच्या मालिकेतील सलग तिस-या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५३० धावा केल्या. स्मिथला कसे बाद करायचे याचे उत्तर अजूनही भारतीय गोलंदाजांना सापडलेले नसून, स्मिथने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत १९२ धावा केल्या. त्याला अखेर उमेश यादवने बाद केले.

Leave a Comment