चक्क… नवजात अर्भकांची विक्री

dharavi
मुंबई – मूल नको असणार्‍या आणि गर्भपातासाठी आलेल्या दाम्पत्यांकडून त्यांचे अपत्य विकत घेऊन दत्तक घेण्यास इच्छुक असणार्‍या दाम्पत्याला विकण्याचा व्यवसायच या डॉक्टरांनी थाटला होता. कांदिवली आणि जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धारावीत हा प्रकार उघडकीस आला आहे.

व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून खरेदी-विक्रीसाठीच्या या कथित ‘प्रॉडक्ट’ची जाहिरात केली जात असे. संबंधित प्रॉडक्ट खरेदीदाराला पसंत पडल्यास भेटीची वेळ ठरवून प्रचंड मोठ्या किमतीवर त्याची खरेदी केली जात असे. एवढेच नाही तर, या बाळांचे बनावट जन्मदाखलेही बनवून देण्यास दोन्ही डॉक्टर तत्पर असत. गेल्या दोन वर्षांपासून हा धंदा सराईतपणे चालत होता. झोपडपट्टीच्या या भागात पैशाची गरज असणारे लोक या व्यवहारात सहभागी होते. गेल्या दोन वर्षात बाळाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी डॉ. मनलिक शर्मा आणि दिगना शर्मा आणि तिचा पती अजय अशा तिघांना अटक केली आहे. यासोबतच, ठाण्याचा एक डॉक्टरही संशयाच्या जाळ्यात अडकला आहे. कायदेशीरदृष्ट्या दत्तक घेण्याची प्रक्रिया किचकट आणि गुंतागुंतीची असल्याने दुकानातून वस्तू विकत आणल्याप्रमाणे पैसे देऊन बाळ विकत आणण्याचा व्यवहार संबंधितांना सोपा वाटत असल्याचे उघड झाले आहे.

एका बाळाची किंमत साधारण ४ ते ६ लाखांच्या घरात असून मध्यस्थी करणार्‍यांना ठराविक वाटाही दिला जात असे. गर्भपात करण्यासाठी आलेल्या दाम्पत्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपये देऊन बाळाला जन्म देण्यासाठी तयार केले जात असे. याप्रकरणी पूर्ण रॅकेटच कार्यरत असून सविस्तर तपासातच पूर्ण खुलासा होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांकडून काहीच सहकार्य मिळत नसल्याने त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment