दिल्ली – दिल्लीतील नॉयडा भागातील विकसक सुपरटेकतर्फे घर खरेदीदारांसाठी आश्वर्यकारक ऑफर दिली गेली असून आत्तापर्यंत अशी ऑफर कुठल्याच बिल्डरने दिलेली नाही. रियल इस्टेट क्षेत्रात बांधून तयार असलेल्या घरांची विक्री व्हावी यासाठी अनेक ऑफर बिल्डर लोकांकडून दिल्या जात असतात. त्यात सोन्याची नाणी, कार, नोंदणी शुल्क, पर्यटनासाठीचा खर्च अशा ऑफर आजपर्यंत ऐकीवात होत्या. मात्र सुपरटेकने त्यांच्या नॉइडा येथील प्रकल्पात आलिशान घराची खरेदी करणार्यांना घरावर आणखी एक घर फ्री अशी ऑफर दिली आहे.
दिल्लीत एकावर एक घर फ्री ऑफर
या ऑफरनुसार नॉईडा येथील त्यांच्या केपटाऊन प्रकल्पात सुमारे १ कोटी ३८ लाख रूपयांचे २३०० चौरस फुटांचे आलिशान घर घेणार्यांना ५०० चौरस फुटांचे २२ लाख रूपये किमतीचे स्टुडिओ अपार्टमेंट फ्री दिले जाणार आहे. मात्र हे अपार्टमेंट त्यांच्या यमुना एक्स्प्रेस वे वरील गोल्फ व्हिलेज मध्ये दिले जाणार आहे.
गेले कांही दिवस तयार घरांची संख्या प्रचंड मात्र म्हणावी तशी विक्री नाही या अडचणीत बिल्डर लोक सापडले आहेत. सध्या दिल्लीत चार ते सात वर्षांपूर्वी बांधून तयार झालेलीही अनेक घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे अशा ऑफर दिल्या जात असून त्यामुळे अडकलेला पैसा मोकळा करून घेणे आणि व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न असे दोन्ही उद्देश आहेत असे सांगितले जात आहे.