एक रूपयांच्या नोटा नववर्षात येणार चलनात

rupaya
बाजारातून लुप्त झालेल्या १ रूपयाच्या नोटा नवीन वर्षात पुन्हा चलनात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने १ जानेवारीपासून या नोटांची छपाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून वित्त मंत्रालयाने तशी अधिसूचनाही जारी केली आहे. या नोटांची छपाई भारत सरकार मुद्रण छापखान्यातच केली जाणार आहे.

सुमारे २० वर्षांपूर्वी १ रूपयांच्या नोटांची छपाई बंद झाली होती. १, २ व पाच रूपयांची नाणी चलनात आल्यानंतर या नोटा छापणे बंद केले गेले होते. १ रूपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९४, २ रूपयांच्या नोटांची छपाई फेब्रुवारी १९९५ तर पाच रूपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९५ मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र पाच रूपयांच्या नोटांची छपाई पुन्हा सुरू करण्यात आली. आता रूपयांच्या नोटांची छपाई सुरू होत आहे.

या नोटेवर वित्त सचिव राजीव महर्षी यांची सही आहे. तसेच मध्यभागी सहज दिसू शकणार नाही असा १ हा आकडा आहे. उजवीकडे याच पद्धतीने भारत हा शब्द आहे. पुढचा भाग गुलाबी हिरव्या रंगाचे मिश्रण असून रूपयाचे प्रतीक चिन्ह त्यावर आहे. उजवीकडेच नंबर छापला जाणार आहे. मागच्या भागात फुलांच्या डिझाईनमध्ये रूपयाचे प्रतीकचिन्ह आणि छपाईचे २०१५ असे वर्ष असेल असे समजते.

Leave a Comment