रत्नागिरी – आंबा लागवडीखालील क्षेत्र व एकूण उत्पादन यात मागील काही वर्षात वाढ झाली असली, तरी राज्यातील आंबा पिकाची उत्पादकता ही देशाच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहे. बदलत्या हवामानाचा फटका आंब्याच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.
अवेळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात
देशातील आंब्याची उत्पादकता ही हेक्टरी सहा टन असून, राज्याची उत्पादकता हेक्टरी दोन टनावर आली आहे. राज्यातील आंबा पिकाखालील क्षेत्रामध्ये मुख्यत: हापूस आंब्याची लागवड सुरुवातीपासून मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. आता नव्याने केसर आंब्याचीही त्यात भर पडत आहे. जगात हापूस आणि केसर आंब्याला मागणी असल्याने राज्यात या जातीच्या आंब्याची लागवड वाढवण्यास खूप वाव आहे. मात्र, गेल्या काही वर्षात राज्यातील आंबा उत्पादनात सातत्याने घट होताना दिसून येत आहे.
सरासरी हेक्टरी तीन टनहून अधिक उत्पादकता असताना सध्या ती हेक्टरी दोन टनावर आली आहे. देशाच्या तुलनेत राज्याची आंबा उत्पादकता निम्म्यावर आल्याचे चित्र आहे. सातत्याने वातावरणात होणारा बदल, अवेळी पडणारा पाऊस याचा फटका आंबा उत्पादनाला बसत असल्याचे बोलले जात आहे.