नाताळनिमित्त बेथलहेमला यात्रेकरूंची मांदियाळी

chrismas
बेथलहेम – येशू ख्रिस्ताचे जन्मस्थळ बेथलहेम येथे नाताळची सुरवात झाली असून जगभरातून या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जमले आहेत. वर्षातील सर्वात मोठी रात्र मानल्या जाणार्‍या २४ डिसेंबरच्या म्हणजे बुधवारच्या मध्यरात्रीपासूनच पश्विम किनार्‍यावरील या शहरातील नॅटिव्हीटी चर्च येथे प्रचंड मोठा उत्सव सुरू झाला आहे. जेथे मेरी मातेने येशूला जन्म दिला, त्याच ठिकाणी हे चर्च बांधले गेले आहे व त्यामुळेच ते पवित्र मानले जाते.

या छोट्याश्या जागेतील सर्व गल्ली बोळही गर्दीने फुलले आहेत. मध्यरात्रीच मॅगर स्क्वेअरमध्ये फादरनी जमलेल्या गर्दीला मिठाई वाटली आणि येथे येणार्‍यासाठी बॅगपायपर वाजवून त्यांचे स्वागत केले गेले. पॅलेस्टिनी झेंड्यांच्या रंगाचे छोटे झेंडे, चांदीच्या खेळण्यांनी येथील प्रचंड ख्रिसमस ट्री सजविले गेले होते व यावेळी येथे स्काऊट मार्चही झाला.

यंदाचा उत्सव साजरा होत आहे पण त्यात थोडी मरगळही असल्याचे पर्यटक सांगत आहेत. जुलै ऑगस्टमध्ये पॅलेस्टीनी जनतेने इस्त्रायलबरोबरच्या युद्धात २२०० हून अधिक जणांचे जीव गमावले आहेत त्यामुळे अनेक घरांतून शोकाचे वातावरण आहे. पोप फ्रान्सिस यांनीही ख्रिश्चन बांधवांसाठी लिहिलेल्या पत्रात अनेकांचा यंदाचा नाताळ भजन, अश्रू आणि दुःख साथीला घेऊनच साजरा होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

Leave a Comment