उशिराने आलेल्या २११ कर्मचार्‍यांवर आयुक्तांची कारवाई

nasik-coroporation
नाशिकः आयुक्तांनी नाशिक महापालिकेतील २११ कर्मचार्‍यांना दणका देत त्यांच्या बेशिस्तपणा बद्दल एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश दिले असून ही कृती खातेप्रमुखांमार्फत करण्यात आली आहे. आयुक्तांच्या दोन्ही भेटींमध्ये अनुपस्थित आढळलेल्या नऊ कर्मचार्‍यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांची एक वेतनवाढही रोखण्यात आली आहे.

आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक महापालिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी पाहणी दौरे सुरू केले आहेत. आयुक्तांनी खातेप्रमुखांचे पथक तयार करून मुख्यालय, विभागीय कार्यालये, सफाई कर्मचार्‍यांच्या शेडला भेटी दिल्या. यादरम्यान आयुक्तांनी १५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या भेटीत ४९२ बेशिस्त कर्मचारी आढळले होते. उशिराने आलेल्या या कर्मचार्‍यांना नोटिसा दिल्यावर ३६५ कर्मचार्‍यांकडून खुलासा मागण्यात आला तर, १०६ कर्मचार्‍यांचे खुलासे असमाधानकारक असल्यामुळे त्यांची एक दिवसाची वेतन कपात करण्यात आली. तसेच ११ कर्मचार्‍यांना गंभीर चूक असल्याचा आक्षेप घेत त्यांच्या सेवा पुस्तिकेतही नोंद करण्यात आली. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा आयुक्तांनी नेमलेल्या पथकाने दिलेल्या भेटीत २९२ कर्मचारी उशिराने आल्याचे आढळले. १९८ कर्मचार्‍यांनी खुलासे सादर केले असून, त्यात ७९ कर्मचार्‍यांचे खुलासे अमान्य करत त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.

Leave a Comment