होंडाचा गुजराथेत कार उत्पादन प्रकल्प

honda
जपानी कार उत्पादक कंपनी होंडा अहमदाबादजवळ विठलापूर येथे १ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक गुंतवणुक करून कार उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भातली अधिकृत घोषणा अद्याप केली गेली नसली तरी होंडाने यासंदर्भातला प्रस्ताव गुजराथ सरकारला दिला असल्याचे आणि येत्या कांही आठवड्यात त्याला परवानगी दिली जाणार असल्याचे समजते.

होंडाने त्यांचा जगातील सर्वात मोठा स्कूटर प्रकल्प याच ठिकाणी तीन महिन्यांपूर्वीच सुरू होत असल्याची व त्यासाठी ११०० कोटींची गुंतवणूक करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. कार उत्पादन प्रकल्प राज्य सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार मेगा प्रोजेक्ट कॅटेगरीत येईल असे सांगितले जात आहे. या प्रकल्पासंदर्भातली बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याचेही संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून समजते. हा प्रकल्प मार्गी लागला तर होंडाची गुजराथेतील ही दुसरी मोठी गुंतवणूक ठरणार आहे. या प्रकल्पात दररोज किती कार तयार होतील याची माहिती दिली गेलेली नाही.

गुजराथेत यापूर्वी टाटा, फोर्ड, मारूती यांनीही गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment