मुंबई – सध्या ‘कुमारी माता’ हा प्रकार राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय ठरला असून कोवळय़ा वयातच त्यांना मातृत्वाचे ओझे झेलणा-या या मुलींच्या वडिलांचेच नाव त्यांच्या अपत्यांना देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च न्यायालयात या तान्हुल्यांना योग्य वैद्यकीय उपचार आणि आहार न मिळाल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करणारी याचिका दाखल झाली आहे. ‘कुमारी माता’प्रकरणी संबंधित सरकारी यंत्रणा काय करत आहेत, याबाबत राज्य सरकारला खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कुमारी माता
उच्च न्यायालयात ही याचिका आदिवासी समाज कृती समितीने दाखल केली असून यवतमाळ जिल्ह्यात कोलम जमातीच्या लोकांचा वावर जास्त आहे. केळापूर, जारी जामनी, मारेगाव, कळंब या तालुक्यांत लग्नापूर्वीच अपत्यांना जन्म देणा-या कुमारी मातांची संख्या लक्षणीय असल्याचे यात म्हटले आहे. कुमारी माता या अपत्यांना आपल्या वडिलांचे नाव देत असल्याचे माहितीच्या अधिकारातून याचिकाकर्त्यांनी समोर आणले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीची कामे सुरू असून कंत्राटदारांकडून अल्पवयीन मुलींची सर्रास लैंगिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.