बँका जानेवारीत १० दिवस राहणार बंद!

bank
नवी दिल्ली – बँक कर्मचा-यांच्या संपासहित एकूण १० दिवस सरकारी बँका नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात बंद राहणार असल्यामुळे नवीन वर्षाचा पहिलाच महिना देशातील नागरिकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. वेतन वाढ करारासंदर्भात समाधानकारक तोडगा न निघाल्याने सरकारी बँक कर्मचा-यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.

सात जानेवारी रोजी एकदिवसीय संपानंतर २१ ते २४ जानेवारी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. तसेच मागण्या मान्य न झाल्यास १६ मार्चपासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे देखील बँक कर्मचा-यांनी घोषित केले आहे.

दरम्यान वेतनवाढी संदर्भात केंद्र सरकार आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने बँक कर्मचा-यांना यापूर्वी तीन वेळा संप पुकारल्यामुळे आता या बाबींवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी या कर्मचा-यांची मागणी आहे. तसे न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा या कर्मचा-यांनी दिला असल्याने अब्जावधी रुपयांचे व्यवहार ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच कोटय़ावधी रुपयांचे धनादेश देखील वटणार नसल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात माहिती देताना बँक कर्मचारी संघटनेचे नेता संजीव मेहरोत्रा यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यांत पाच दिवस आम्ही संपावर जाणार आहोत. ०७,२१,२२,२३ आणि २४ जानेवारीला बँक कर्मचारी संपावर असतील. ११, १८ आणि २५ जानेवारी रोजी रविवार असल्याने व २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने २० जानेवारीनंतर थेट २७ जानेवारी रोजी बँका सुरु होणार आहेत. तसेच जानेवारी महिन्यात एकूण १० दिवस बँका बंद राहणार आहेत. तरी नागरिकांनी बँकांशी संबंधित कामकाज या दिवसांच्या पूर्वी पूर्ण करावेत असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment