
नाशिक : शेतमाल व्यापा-यांनी आडत बंदीच्या निर्णयाविरोधात संप पुकारल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून संघटनेने संप करणा-या व्यापा-यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकरी आडत बंदीचा निर्णय मागे घेतल्यास रस्त्यावर उतरतील, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
‘स्वाभिमानी’ची मागणी; संपक-यांवर करा गुन्हे दाखल
बाजार समित्यामंधील गेल्या अनेक वर्षांपासून शेतमाल व्यापा-यांकडून शेतक-यांची हमाली, आडत आणि तोलाईच्या माध्यमातून लूट केली जात होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पणन खात्याने शेतक-यांऐवजी व्यापा-यांकडून आडत वसूली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकरी व्यापा-यांच्या जाचातून सुटका झाल्यामुळे आनंदीत झाला असतानाच आडत वसूलीच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतमाल व्यापा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत संप पुकारला. त्यातच सकाळी शेतमाल घेऊन बाजार समित्यांमध्ये दाखल झालेल्या शेतक-यांची तारांबळ उडाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत संप पुकारणा-या शेतमाल व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच व्यापा-यांच्या दबावाला बळी पडून सरकारने आडत बंदीचा निर्णय मागे घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
