विश्‍वचषकानंतर निवृत्त होणार आफ्रिदी

afridi
लाहोर – पाकिस्तान क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज शाहीद आफ्रिदीने पुढील वर्षी होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय सामन्यांमधून मी निवृत्ती घेणार असून टी-२० क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिकेत जखमी मिसबाह-उल-हकच्या जागी आफ्रिदीची कर्णधारपदी वर्णी लागली होती. या मालिकेत त्याने अष्टपैलू खेळ सादर करताना २०५ धावा कुटून आठ गडीदेखील बाद केले होते.

आफ्रिदी विश्‍वचषकादरम्यान वयाची पस्तीशी पूर्ण करणार असून पाकिस्तान संघाकडून तो आजवर ३८९ सामने खेळला असून १९९६ सालच्या ऑक्टोबरमध्ये नैरोबी येथे पदार्पणातच त्याने श्रीलंकेविरुद्ध केवळ ३७ चेंडूत वेगवान शतक झळकाविले होते. तब्बल १७ वर्षे त्याचा हा विक्रम अबाधित होता. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात न्यूझीलंडच्या कोरी ऍण्डरसनने त्याचा हा विक्रम केवळ ३६ चेंडूत शतक ठोकून मोडित काढला. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ११६.२९ च्या स्ट्राईक रेटने ७८७० धावा केल्या असून ३९१ गडी बाद केले आहेत. २०१० साली त्याने कसोटीतून निवृत्ती पत्करली होती. ‘आजवरच्या कारकीर्दीवर मी समाधानी आहे. मात्र, १७ वर्षे अबाधित राहिलेल्या वेगवान शतकाचा विक्रम मोडित निघाल्याचे शल्य मला कायम बोचत राहील, अशी प्रतिक्रिया देखील त्याने व्यक्त केली.

Leave a Comment