पाकिस्तान यापुढे भारतात कबड्डी खेळणार नाही

kabbadi
भटिंडा – भारतीय पुरुष संघाने सलग पाचव्यांदा पंजाब सरकारने आयोजित केलेल्या कबड्डी विश्व कप स्पर्धेत विजय मिळवला असला तरी अंतिम सामना पाकिस्तानी खेळाडूंच्या अश्रूंमुळे चर्चेत आला आहे. पंचांवर पक्षपात केल्याचा आरोप पाक खेळाडूंनी करत या पुढे भारतात कबड्डी खेळण्यास नकार दिला आहे.

पंचांनी भारताविरोधात अंतिम सामना सुरू असताना पक्षपातीपणा केल्याने आम्ही नाराज झालो आहोत. भारतालाच विजयी करण्यासाठी निश्चित वेळेच्या तीन मिनिटे आधीच खेळ संपवण्यात आला, असा आरोप पाक संघाचा कर्णधार शफिक चिश्ती याने केला आहे. तसेच भारतीय खेळाडूंनी अंगाला मोहरीचे तेल लावले होते. ज्यामुळे ते आमच्या हातून निसटत होते आणि आम्हाला पाणी पिण्यासाठी देखील वेळ दिला गेला नाही, असेही आरोप शफिकने केले. भारत निःपक्षपणे खेळेल अशी आशा होती पण तसे न झाल्याने या पुढे आम्ही कबड्डी खेळण्यासाठी भारतात पाऊल टाकणार नाही, असा इशारा पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक मलिक सफदर यांनी दिला.

Leave a Comment