पुणे : रविवारी सायंकाळी हडपसर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसवर अज्ञात इसमांनी केलेल्या दगडफेकीत १३ विद्यार्थी जखमी असून पोलिसांनी याप्रकरणी ६ अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
हडपसरमध्ये शाळेच्या बसवर दगडफेक; १३ विद्यार्थी जखमी
याबाबत हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरच्या जवळच असलेल्या काळेपडळ भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रविवारी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थाना घेऊन बस निघाली असताना अज्ञात व्यक्तींनी या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये १३ विद्यार्थी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अचानक झालेल्या दगडफेकीच्या घटनेने विद्यार्थांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यापूर्वीही याच भागात अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. वारंवार होणाऱया दगडफेकीच्या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.