भारताने जिंकला ‘कबड्डी विश्वचषक’

kabddi
नवी दिल्ली : यजमान भारताने पाकिस्तानचा ‘विश्वकप कबड्डी’ स्पर्धेत पुरूष गटात तर महिला संघाने न्युझीलंडचा पराभव करीत ‘विश्वचषक’वर आपले नाव कोरले. पुरूष गटात भारताने सलग पाचव्यांदा, तर महिला गटाने सलग चौथ्यांदा हा किताब पटकावला आहे.

पंजाबच्या मुत्तसरमधील गुरू गोविंदसिंग स्टेडियममध्ये झालेल्या विश्वकप कबड्डी स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, अर्जेंटीना, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इराण, डेन्मार्क, स्पेन, आणि स्वीडन या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम लढत भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये झाली. त्यात भारताने पाकिस्तानचा ४५-४२ गुणांनी पराभव केला. भारताकडून संदिपसिंह सुराखपूर आणि संदिप लड्डर यांनी अनुक्रमे १६ आणि १० गुणांची कमाई करीत भारताचा विजय साकार केला. तर महिला गटात भारताने न्यूझीलंडचा ३६-२७ गुणांनी पराभव केला. पुरूष गटातील विजेत्या भारतीय संघास दोन कोटी, तर महिला संघास एक कोटी रूपयाचे बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाला प्रत्येकी एक कोटी रूपयाचे बक्षिस देण्यात आले.

Leave a Comment