‘फ्लिपकार्ट’ने उभारले ४,४०० कोटीचे भांडवल

flipkart
बंगलोर- ४,४०० कोटी रुपये (७० कोटी डॉलर) भांडवल उभारणी केल्याचे आघाडीची ई-कॉमर्स सेवा पुरवठादार फ्लिपकार्टने जाहीर केले असून फ्लिपकार्टच्या एकूण गुंतवणूकदारांची संख्या या भांडवल उभारणीनंतर ५०च्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने सिंगापूर येथील कंपनी नियामक ‘एसीआरए’कडे पब्लिक कंपनीचा दर्जा मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. देशातील व्यावसायिक विस्तारासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निधीची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

बेली गिफॉर्ड, ग्रीन नोक्स कॅपिटल, स्टीडविव कॅपिटल, टी. रॉ प्राईस असोसिएट्स आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी यांनी ही गुंतवणूक केल्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळावर या गुंतवणूकदारांचा समावेश झाला आहे. फ्लिपकार्ट लिमिटेड ही सिंगापूरमध्ये नोंदणी झालेली कंपनी असून नव्या गुंतवणूकदारांसह भागधारकांची संख्या ५०च्या पुढे गेली आहे. येथील नियमानुसार पब्लिक कंपनी म्हणून सक्तीचे असल्याने त्यानुसार एसीआरएकडे अर्ज केल्याचे फ्लिपकार्टने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

नव्याने झालेल्या भांडवल उभारणी फेरीमध्ये डीएसटी ग्लोबल, सीआयसी, आयकॉनिक कॅपिटल आणि टायगर ग्लोबल यांनीही सहभाग घेतला. सिंगापूरमधील नियमांनुसार उचललेले हे पाऊल आहे. यातून सार्वजनिक भागविक्री किंवा सिंगापूर तसेच जगाच्या इतर भागातील व्यावसायिक हालचालींचे संकेत देण्याचा अजिबात उद्देश नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment