ओबामांनी रचला नवा इतिहास – घेतली महिला पत्रकार परिषद

obama
वॉशिंग्टन – हवाई द्विपवर आपल्या कुटुंबासह सुट्टीवर रवाना होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी या वर्षातली शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेताना व्हाईट हाऊसच्या इतिहासात नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. फक्त महिला पत्रकारांसाठी ओबामांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते व्हाईट हाऊसमध्ये फक्त महिला पत्रकरांसाठी परिषद घेणारे पहिले राष्ट्रपती ठरले.

अर्थात यापूर्वी ओबामांनी सप्टेंबरमध्ये वेल्स नाटो समिट मध्येही महिला पत्रकारांसाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जाँश अर्नेस्टनी दिलेल्या माहितीनुसार ओबामांसंबंधीच्या बातम्या सातत्याने कव्हर करणार्याप महिला पत्रकार अनेक संस्थांतून आहेत हे आमच्या लक्षात आले होते. या पत्रकार परिषदेच्या वेळी आलेल्या प्रश्नांची यादी पाहता यावेळी महिलांना पुढे येऊन राष्ट्रपतींना थेट प्रश्न विचारण्याची संधी द्यायची असे अध्यक्षांनी ठरविले. या पत्रकार परिषदेच्या वेळी ओबामा अतिशय चांगल्या मूडमध्ये होते.

या परिषदेत आठ महिला पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली. त्यात क्युबा, सोनी हॅकिग, अश्वेत मुद्दा अशा विषयांवर त्यांना प्रश्न विचारले गेले. या महिला पत्रकार रेडिओ आणि प्रिंट माध्यमातल्या होत्या. ओबामाच्या या महिला स्पेशल पत्रकार परिषदेची सोशल मिडीयावरही खूप चर्चा झाली आणि अनेकांनी त्यांचे त्यासाठी कौतुकही केले.

पत्रकार परिषदेसाठी येताना ओबामांनी पहिल्या रांगेत बसलेल्या पुरूष पत्रकारांकडे दुर्लक्ष करून मागे बसलेल्या माहिला पत्रकारांना पुढे येऊन बसण्याची विनंती केली असेही समजते.

Leave a Comment