शिवाजी पार्कवर पुन्हा धडाडणार राजकीय तोफा

shivaji
मुंबई – राज्यात सत्तेवर आल्यानंतर नवीन सरकारने एमआरटीसी कायद्यात बदल केल्यामुळे राज्यातील सर्व मैदानांसह मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर राजकीय सभांप्रमाणे अन्य कार्यक्रम घेण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी कांही काळ शांत राहिलेल्या या मैदानावर राजकीय तोफा पुन्हा धडाडू शकणार आहेत. सायलेंट झोन म्हणून मुंबईच्या मध्यवस्तीतील शिवाजी पार्क परिसर जाहीर झाल्यानंतर येथे राजकीय सभांसाठी उच्च न्यायालयाने घातलेली बंदी त्यामुळे आता निरूपयोगी ठरली आहे.

यापूर्वी शिवाजी पार्कवर वर्षातील ३० दिवस धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली जात असे. शिवसेनेचा दसरा मेळावा याच मैदानावर घेतला जात असे. सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप याच मैदानावर दिला गेला होता. मात्र येथील नागरिकांनी केलेल्या याचिकेनुसार हा परिसर सायलेंट झोन ठरविला गेला होता व परिणामी येथे राजकीय सभांना बंदी घातली गेली होती. शिवाजी पार्कवरील कोणत्याही पक्षाची सभा म्हणजे त्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन समजले जात असे. कायदा बदलामुळे पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना आपले शक्तीप्रदर्शन या मैदानावर सभा घेऊन दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Leave a Comment