सर्बिया या युरोपिय देशाची राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर असलेले बेलग्रेड हे अनोखे शहर म्हणून जगाला परिचित आहे. पर्यटकांच्या अत्यंत आवडीचे हे शहर दीर्घकाळ संघर्षांचे केवळ साक्षीदारच राहिलेले नाही तर वेळोवेळी ते ४० वेळा नष्ट झाले आणि त्याचे पुनर्मिमाण केले गेले असे इतिहास सांगतो. येथील इमारतींवर आजही युगोस्लाव्हियातील संघर्ष व नोटो सेना विमान हल्यांच्या खुणा पाहायला मिळतात.
वारंवार नष्ट होऊन पुन्हा वसलेले बेलग्रेड
हे शहर अन्य युरोपिय शहरांसाठी मॉडेल बनले आहे कारण दीर्घकाळ आक्रमणांचा सामना करूनही या शहराने आपला सांस्कृतिक वारसा जपला आहे. कला संगीत, पेटींग्ज यांचा वारसा या शहराने जतन केला आहेच पण येथील ऐतिहासिक स्थळे हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. सवा आणि डॅन्यूब नद्यांवर वसलेल्या या शहराच्या नावाचा अर्थ आहे व्हाईट सिटी. रोमन ऑगस्टसने हे शहर प्रथम जिंकले व त्यानंतर वेगवेगळ्या आक्रमणांचा सामना या शहराला करावा लागला. पूर्वी युगोस्लाव्हियाची राजधानी असलेले हे शहर विभाजनानंतर सर्बियाची राजधानी बनले आहे.
या शहरात रोजगारानिमित्ताने ग्रामीण भागातून स्थलांतरीत होऊन आलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे त्याचप्रमाणे अन्य देशांतून निर्वासित होऊन आलेलेही अनेक नागरिक आहेत. अनेक धर्माचे लोक येथे राहतात आणि या शहरात वर्षभर विविध महोत्सव सुरू असतात. फिल्म, थिएटर, म्युझिक, बुकफेअर, बिअर फेस्ट, असे अनेक उत्सव साजरे होत असलेल्या या शहरात अनेक सुंदर म्युझियम्सही आहेत. त्यातील नॅशनल म्युझियम, रेल्वे म्युझियम, अॅव्हीएशन म्युझियम विशेष प्रसिद्ध आहेत. खाण्यापिण्यासाठी येथे बहुविध प्रकारचे कॅफे, रेस्टॉरंट आहेतच पण मनाला शांतता देणारी अनेक पार्क या शहराचे खास वैशिष्ठ्य आहे.