तिसऱ्याच दिवशी रंगतदार स्थितीत ब्रिस्बेन कसोटी

cricket
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळली जाणारी ब्रिस्बेन कसोटी रंगतदार स्थितीत येऊन पोहचली आहे. भारतावर या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतली असून, टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर त्यानंतर एक गडी गमावून ७१ धावा केल्या आहेत.

तिसऱ्या दिवसा अखेरीस खेळ संपला तेव्हा सलामीवीर शिखर धवन २६ आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर खेळत होते. पहिल्या डावातला भारताचा शतकवीर मुरली विजय याचा मिचेल स्टार्कने २७ धावांवर त्रिफळा उडवला.

तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव ५०५ धावांवर आटपला. ऑस्ट्रेलियाच्या या डावाचा आधारस्तंभ ठरला तो कर्णधार स्टीव्हन स्मिथ. स्मिथने आपल्या कसोटी कारकीर्दीतले सहावे शतक साजरे केले. स्मिथने १९१ चेंडूंत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १३३ धावांची खेळी केली.

स्मिथला मिचेल जॉन्सनकडून दमदार साथ मिळाली. त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. जॉन्सनने ९३ चेंडूंत १३ चौकार
आणि एका षटकारासह ८८ धावांची खेळी केली. स्मिथ आणि जॉन्सन बाद झाल्यावरही ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाला तंगवले. मिचेल स्टार्कने ५२ धावांची, नॅथन लायनने २३ धावांची आणि जोश हेझलवूडने नाबाद ३२ धावांची खेळी केली.

Leave a Comment