जनधन अपघात विमा योजना लाभ रूपे कार्ड वापरणार्‍यांनाच मिळणार

rupay
दिल्ली – पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत देण्यात येणारा १ लाखाचा अपघात विमा योजनेचा लाभ जे खातेधारक ४५ दिवसांत किमान एकवेळा रूपे कार्डचा वापर करतील त्यांनाच मिळणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्यांचे पूर्वीच बँक खाते आहे त्यांना नवीन खाते उघडण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून त्यांना फक्त रूपे कार्ड बँकेकडून घ्यावे लागणार आहे.

या खात्यासाठी ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली गेली आहे. मात्र ज्यांच्या खात्यांचे व्यवहार समाधानकारक आहेत त्याच खातेदारांना ही सूविधा दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत १८ ते ७० वर्षांपर्यंत सर्व खातेधारकांना अपघात विमा लाभ मिळणार असला तरी त्यांनी दीड महिन्यात किमान एकदा रूपे कार्डचा वापर केला पाहिजे असे बंधन आहे. त्याचबरोबर ३० दिवसांच्या आत अपघाताची सूचना ज्या बँकेच्या शाखेत खाते आहे तिथे दिली जाणेही आवश्यक आहे.

१५ ऑगस्ट १४ ते २६ जानेवारी २०१५ पर्यंत ज्यांनी बँकेत नव्याने खाती उघडली आहेत त्या कुटुंबप्रमुखालाच हे अपघात विमा संरक्षण मिळणार असून सरकारी कर्मचारी, त्यांची कुटुंबे, आयकरदाते तसेच आम आदमी विमा योजना असलेल्यांना या विम्याला लाभ दिला जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment