सुपर हिरो प्रियाचे नवे डिजिटल कॉमिकस

priya
भारतात नव्याने सुरू झालेल्या डिजिटल कॉमिक्सचा विषय लैगिंक अत्याचाराविरोधात लढा देणारी सुपरहिरो प्रिया हा आहे. देशाच्या नव्या पिढीचे लक्ष लैंगिक समानतेकडे वेधले जावे या उद्देशाने हे कॉमिक सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पौराणिक कथांचा आधार घेऊन स्टोरी रचली गेली आहे.

या कॉमिकमध्ये अत्याचाराची शिकार झालेल्या प्रिया या सुपरहिरोची कहाणी सांगितली गेली आहे. प्रिया ही ग्रामीण युवती आहे आणि तिच्यावर बळजबरीने सामुहिकरित्या दुष्कर्म केले जाते. यामुळे घरचे लोक तिला घराबाहेर काढतात. प्रिया या अन्यायाविरोधात लढण्यासाठी देवी पार्वतीची उपासना करते आणि देवी पार्वती म्हणजेच दुर्गा तिला लैगिक अत्याचार झालेल्यांच्या मदतीसाठीची आणि अत्याचार करणार्‍यांच्या निर्दाळणासाठी शक्ती देते अशी ही कथा. वाघावर स्वार होऊन प्रिया अशा महिला युवतींना सहाय्य करतेच तसेच अत्याचार करणार्‍यांचा नायनाटही करते.

भारतीय वंशाचे अमेरिकी फिल्म निर्माते राम देवीनेनी यांचाही या कॉमिक निर्मीतीत सहभाग आहे. ते म्हणाले की दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दिल्ली र्गंगरेप प्रकरणापासूनच हा विषय डोक्यात घोळत होता. महिलांना योग्य न्याय देणारा समाज आपल्याकडे नाही. तो निर्माण व्हावा हा उद्देश आहे. यातील चित्रे विशेष तंत्राने तयार केली आहेत. स्मार्टफोनने त्यांचे फोटो काढले तर विशेष अॅनिमेशन चित्रे दिसतात.