रशियन रूबलच्या घसरणीने भारत सरकार सतर्क

rubal
दिल्ली – रशियन चलन रूबलमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीने भारत सरकार सतर्क बनले असून अर्थमंत्रालयाने रशियाबरोबर कांही आठवड्यापूर्वीच स्थानिक चलन व्यवहार करण्यासंदर्भात जी रणनिती आखायला सुरवात केली होती तिचा वेग कमी केला असल्याचे वृत्त आहे. रूबल मधील घसरण वित्त मंत्रालय तसेच रिझर्व्ह बँकेनेही गंभीरपणे घेतली आहे.

विशेष म्हणजे गेल्या कांही आठवड्यात रशियाबरोबरच इंडोनेशिया, तुर्कस्तानसह अनेक विकासशील देशांच्या चलनात घसरण होत असून त्यात भारतीय रूपयाचाही समावेश आहे. ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब ठरते आहे कारण या देशांतच भारत आपल्या उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ म्हणून पाहात आहे. चलन दरातील घसरण हा त्याला मोठाच ब्रेक ठरतो आहे.

रूबलची घसरण रोखण्यासाठी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी अर्ध्या रात्रीत व्याजदर वाढीचे उचललेले पाऊल फारसे उपयुकत ठरलेले नाही. इंडोनेशियातील चलन रूपिया १९९७ पेक्षाही सर्वाधिक वेगाने घसरते आहे. दक्षिण कोरियाने त्यांच्या वोनची घसरण थांबविण्यासाठी कडक उपाय योजले आहेत मात्र त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. सिंगापूर डॉलरचीही तीच कथा आहे. त्यामुळेच भारताने या देशांचा बाजारपेठांचा विचार करताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक मानले असल्याचे सांगितले जात आहे. या घसरणीचा स्थानिक शेअर बाजारांवरही विपरित परिणाम होणार असल्याचे तसेच क्रूड तेल दर कपातीचाही शेअर बाजारावर विपरित परिणाम होणार असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे.

Leave a Comment