भांडवली वस्तूंच्या आयातीच्या प्रोत्साहनामुळे देशाच्या उत्पादन क्षेत्राला लाभ – वाणिज्य सचिव

rajvee-kher
मुंबई – गेल्या काही महिन्यात भांडवली वस्तंच्या आयातीला मिळणारे प्रोत्साहन देशाच्या उत्पादन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी चांगले लक्षण असल्याचे केंद्रीय वाणिज्य सचिव राजीव खेर यांनी आज स्पष्ट केले. मुंबईत आयोजित चौथ्या “इंडिया इंजिनिअरिंग सोर्सिंग शो”च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने ईईपीसीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नोव्हेंबर २०१४ दरम्यान भांडवली वस्तूंच्या आयातीत ४९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. सरकारची “मेक इन इंडिया” घोषणा आणि त्याला अनुसरुन आलेली धोरणे यामुळे उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षात मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीत आपण फार मोठी झेप घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत लोखंड आणि पोलादाच्या वस्तूंपासून हवाई अंतराळ उत्पादनांपर्यंतचा समावेश आहे यापैकी विजेते कोण; यांची निवड करुन आपण त्यांचा गौरव केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. संरक्षण उत्पादन, रेल्वे आणि बांधकाम क्षेत्र परकीय थेट गुंतवणुकीसाठी खुली झाल्यामुळे भारतात गुंतवणुकीच्या भरपूर संधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. सौर ऊर्जेची गरज लक्षात घेता पुनर्वापरायोग्य आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही भरपूर वाव आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रातही गुंतवणूकीच्या भरपूर संधी आहेत. परराष्ट्र व्यापार धोरणाचे काम सुरु असून हे धोरण अभियांत्रिकी उत्पादनांची ओळख निर्माण करेल असे ते म्हणाले. तंत्रज्ञानयुक्त आणि कौशल्य विकसन क्षेत्राला मोठी चालना मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. निर्यातदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment