निलेश राणेंनी आवळला हिंदुत्वाचा राग

nilesh
मुंबई – काँग्रेसच्या वर्तुळात नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या हिंदूत्ववादी ट्विटमुळे चांगलीच चर्चा रंगली असून एका बाजूला काँग्रेसचे धुरीण संसदेत आग्रा धर्मांतरण मुद्यावरून जंगजंग पछाडत असतानाच, काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी सर्वांना लवकरात लवकर हिंदू बनवावे असे ट्वीट केले आहे.

केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे तर संपूर्ण जगभर दहशतवादी कारवाया सुरू असल्यामुळे भारताला असे हल्ले थोपवायचे असतील तर लवकरात लवकर भारतातील लोकांना हिंदू बनविण्याचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा, असे ट्वीट काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

त्याच बरोबर निलेश राणे यांनी आपण केलेले ट्वीट हे व्यक्तीगत असून यात पक्षाचा संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. आग्रा तसेच अलिगड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या धर्मांतरणात काहीही चुकीचे नसून धर्मांतर करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. युपीतील धर्मांतर हे बंदुकीच्या धाकावर तर होत नाही, मग त्याला विरोध करायचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दहशतवादाचा सामना हिंदू धर्म मजबुतीने करू शकतो, ती धमक इतर धर्मात नाही. मी हिंदू कुटुंबात जन्माला आल्याने हिंदुंच्या भल्यासाठीच हे विचार मांडत असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदू समाज जर का एकत्र आला तर दहशतवाद्यांना हजारदा विचार करावा लागेल की यांच्यावर हल्ला करावा की नाही.

याशिवाय पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. तालिबानचा समूळ नायनाट करण्याची आता वेळ आली असल्याचेही ट्वीट त्यांनी केले आहे.

Leave a Comment