भारत सरकार विदेशी बँकातून असलेल्या भारतीयांचा काळा पैसा परत आणण्यासाठी कसून प्रयत्नशील असतानाच ग्लोबल फिनान्शियल इंटेग्रिटी या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांचा नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २०१२ सालात विदेशात काळा पैसा पाठविणार्या देशांच्या यादीत भारताचा नंबर तिसरा असून पहिल्या नंबरवर चीन तर दोन नंबरवर रशिया हे देश आहेत. या अहवालानुसार विकासशील देशांतून गेल्या दशकात म्हणजे २००३ पासून २०१२ पर्यंतच्या काळात ६६०० अब्ज डॉलर्स विदेशात पाठविले गेले आहेत तर २०१२ या एकाच वर्षात हाच आकडा ९९१.२ अब्ज डॉलर्स इतका आहे.
चीन, रशिया, भारतातून ४४० अब्ज डॉलर्सचा काळा पैसा
या अहवालानुसार विकासशील देशांतून विदेशी बँकात पाठविण्यात आलेला काळा पैसा हा प्रामुख्याने भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि करचुकवेगिरीतील पैसा आहे. गेल्या दशकांत विदेशी पाठविलेल्या गेलेल्या काळ्या पैशात भारताचा हिस्सा १० टक्के इतका आहे. २०१२ सालात भारतातून ९४.७६ अब्ज डॉलर्स ( ६ हजार कोटी रूपये) विदेशी बँकात जमा केले गेले आहेत. चीनमधुन याच काळात २४९.५७ अब्ज तर रशियातून १२२.८६ अब्ज डॉलर्स पाठविले गेले आहेत.
या यादीत चार नंबरवर मेक्सिको आणि पाचव्या नंबरवर मलेशिया आहे. या दोन्ही देशातूंन अनुक्रमे ५९.६६ व ४८.९३ अब्ज डॉलर्स विदेशी बकातून जमा केले गेले आहेत. ग्लोबल फिनान्शियलचे अध्यक्ष रेमंड वेकर यांच्या मते उभरत्या आणि विकासशील अर्थव्यवस्थांसमोर हा अवैध पैसा ही सर्वात मोठी आर्थिक समस्या ठरली आहे. या देशांत विदेशातून येत असलेल्या गुंतवणुकीपेक्षाही बाहेर पाठविला जात असलेला काळा पैसा अधिक मोठा आहेच पण वर्षानुवर्षे त्यात वाढ होते आहे ही चिंतेची परिस्थिती आहे.