एकाच वेळी गायब झाल्या १०० हून अधिक नववधू

vietnam
चीन पोलिस सध्या गायब झालेल्या १०० हून अधिक नवविवाहितांचा शोध कसून घेत असल्याचे वृत्त आहे. या सर्व व्हीएतनामी महिला आहेत. स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार चीनच्या उत्तर प्रांतातील हेबेई येथे ही घटना घडली आहे. लग्न जमविणार्‍या संस्थेतर्फे हे विवाह झाले होते मात्र संस्थेची प्रमुख माइयु ही व्हिएतनामी महिलाही गायब असल्याने यामागे एखादी सुसंघटीत संघटना असावी असा पोलिसांचा कयास आहे. माइयु गेली २० वर्षे चीनमध्ये राहते आहे आणि अशी लग्ने जमनिण्याचे काम करते आहे. नोव्हेंबरमध्ये या नवविवाहिता एकाचवेळी गायब झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये गेली कांही दशके राबविल्या गेलेल्या एकच मूल योजनेमुळे तेथे मुलींचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. परिणामी लग्नाळू मुलांसाठी मुली मिळविणे अत्यंत दुरापास्त होऊन बसले आहे. अनेक वेळा दक्षिण पूर्व आशियाई देशातून गरीब घरातील मुली येथे आणून पैशांच्या बदल्यात त्यांची लग्ने लावून दिली जातात. हेबेई मध्ये घडलेल्या घटनेतही मध्यस्त महिलेने लग्नाळू मुलांकडून प्रत्येकी ११ लाख ६० हजार रूपये घेऊन अशी १०० हून अधिक मुलांची लग्ने लावून दिली होती. मात्र महिनाही उलटला नाही तो पर्यंत या मुलींनी दुसर्‍या मुलींकडे जेवायला जातो असे सांगून पोबारा केला त्या अद्याप सापडलेल्या नाहीत.

Leave a Comment