यंदाही अनवाणी धावून विजयी झाल्या लताबाई

lata
बारामती- गतवर्षी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ३ किमीच्या धावस्पर्धेत अनवाणी धावून पहिल्या आलेल्या ६७ वर्षीय लताबाईंनी यावर्षीही या स्पर्धेत धावून पहिला क्रमांक कायम टिकविला आहे. गतवर्षी आजारी पतीच्या उपचारासाठी पैसे मिळविण्यासाठी लताबाईंनी ही धाव घेतली होती तर यंदा त्यांना मुलांना रोजगार मिळावा यासाठी धावण्याचा आधार घ्यावा लागला आहे.

लताबाई मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या. काबाडकष्ट करून घर चालविणार्‍या. त्यांच्या पतीला हृदयविकाराचा आजार होता. उपचारासाठी १५ हजार रूपयांची गरज होती. त्यामुळे गतवर्षी लताबाईंनी ५ हजार रूपयांचे इनाम असलेल्या या स्पर्धेत धावून विजय मिळविला. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना अनेकांनी पुढे येऊन पैशांची मदत केली. आता त्यांचे यजमान पूर्णपणे बरे झाले आहेत. तीन मुलींच्या लग्नात जवळची पुंजी खर्ची पडलेली असून त्यांचा एक मुलगा मजुरीच करतो. लताबाई सांगतात आता मला पैसे नकोत मुलाला रोजगार मिळावा अशी आमची इच्छा आहे.

Leave a Comment