पेशावर – आज सकाळी पाकिस्तानात पेशावरमधील लष्करी शाळा आणि महाविद्यालयावर मोठा दहशतवादी हल्ला झाला असून हा हल्ला तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने केला आहे. या संघटनेचे सहा सशस्त्र दहशतवादी पेशावरच्या लष्करी शाळेत घुसले असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हे सहाही दहशतवादी लष्करी गणवेशात होते. शाळेत प्रवेश केल्यानंतर वर्गात घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला आहे.
पाकिस्तानात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
पाकिस्तानी सुरक्षापथकांनी चारही बाजूंनी या शाळेला वेढा घातला असून, दहशतवाद्यांबरोबर त्यांची चकमक सुरु आहे. अठरा मुले या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा रक्षकांना आतापर्यंत चार मुलांची सुटका करता आली असून, अनेक मुले अजूनही वर्गांमध्ये अडकली आहेत. हे सर्व दहशतवादी आत्मघातकी मोहिमेवर असल्याचे तेहरीक-ए-तालिबानने म्हटले आहे.