नागपूर : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली असून सरकारने कोरडवाहू शेतीसाठी १० हजार रुपये प्रती हेक्टरी, तर बागायती शेतीसाठी प्रती हेक्टरी १५ हजार रुपये देण्याची घोषणा केल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत दिली. त्याचबरोबर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे तीन महिन्याचे वीजबील माफ करण्याची घोषणाही यावेळी खडसे यांनी केली.
अखेर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर
अवकाळी पावसामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला अडीच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्याचे मोठ्या जनावराचा मृत्यू झाल्यास २५ हजार, मध्यम जनावर, १० हजार आणि लहान जनावरांसाठी साडे तीन हजार रुपये मदत मिळणार आहे.
त्याचबरोबर सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पक्क्या घरांसाठी ७० हजार, कच्च्या घरांसाठी २५ हजार तसेच अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवसात मोठे नुकसान झाल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारने केला आहे.