`हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ स्वीकारण्यास धनंजय देसाईच्या पत्नीचा नकार

rasika-desai
पुणे – पुण्यातील हडपसरमध्ये मोहसीन शेख या मुस्लिम इंजिनिअरच्या हत्ये प्रकरणी जेलमध्ये असलेला हिंदू नेता धनंजय देसाईच्या पत्नीने समस्त हिंदू आघाडी मंचतर्फे देण्यात येणारा `हिंदू शौर्य पुरस्कार’ स्वीकारण्यास नकार दिला आहे.

धनंजय देसाई हे तुरुंगातून सुटल्याशिवाय कोणताही पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्याची पत्नी रसिका देसाईने स्पष्ट केले. रसिकाच्या या पवित्र्यानंतर हिंदू आघाडी मंचनेही `यू टर्न’ घेतला आहे. रसिका यांच्या भावनांचा आदर करत कार्यक्रम रद्द करत असल्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे.

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते धनंजय यांच्यावतीने त्यांच्या पत्नी रसिका यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. कार्यक्रमाशी संबंधित शिवसेना नेते मिलिंद एकबोटे यांनी याबाबत सांगितले की, धनंजय निर्दोष असून त्याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. या पुरस्काराशी शेख यांच्या हत्येचा काहीही संबंध नसल्याचेही मिलिंद म्हणाले.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमासाठी अनेक संघटनांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही समावेश आहे. मात्र या कार्यक्रमाशी काहीही देणेघेणे नसल्याचे संघाच्या एका नेत्याने स्पष्ट केले.

Leave a Comment