वाढणार नाही युरियाची किंमत : केंद्रीय खत व रसायन मंत्री

anant-kumar
नवी दिल्ली – केंद्रीय खत व रसायन मंत्री अनंतकुमार यांनी खतांवरील अनुदान कमी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगून युरियाच्या किमतीतही वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी राज्यसभेत एका सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

देशातील वाढती खताची मागणी पूर्ण करण्यासाठी गोरखपूर, तलचर व रामागुंडा येथील बंद पडलेले खत कारखाने पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर मंगलुरू, चेन्नई व तुतिकोरीन या तीन कारखान्यातील खतांवर सबसिडी वाढवणार असून, त्याबदल्यात संबंधित राज्यांनी नेफ्तावर व्हॅटमध्ये सूट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

व्यापक खत धोरणानुसार आवाहन करताना अनंतकुमार म्हणाले की, नायट्रोजन, फॉस्फोरस व पोटॅश खतांच्या किमती कमी करण्यासाठी न्यूट्रिएट आधारित सबसिडीला युक्तिसंगत बनवण्यासाठी वैज्ञानिकांशी चर्चा करणे आवश्यक आहे.

देशात १६ कोटी रुपये खर्चून एक हजारापेक्षा अधिक मृदा परीक्षण केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा झाल्याने शेतकर्‍यांना फायदा होणार असून ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांना यावेळी धन्यवाद दिले.

Leave a Comment