ब्रेडचे गुलाबजाम

gulab
साहित्य- ब्रेडचे पाच सहा स्लाईस, १ चमचा मैदा, १ चमचा बारीक रवा, तळण्यासाठी रिफाईंड, पाकासाठी साखर, सजावटीसाठी पिस्ता, बदाम काप

कृती – ब्रेडचे स्लाईस ताटलीत घालून त्यावर थोडे दूध घालून भिजवावेत. पाच मिनिटांनंतर हे स्लाईस दाबून पिळावे व त्यातील जास्तीचे दूध काढून टाकावे. नंतर स्लाईस कुस्करून लगदा करावा. त्यात रवा, मैदा मिसळून चांगले मळावे. हे मिश्रण अगदी मऊ झाले पाहिजे. नंतर या मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. तेल चांगले तापवून त्यात हे गोळे हलक्या आचेवर गुलाबी रंगावर तळावेत.

प्रथम एक गोळा तळून तो फोडावा व आतून चांगला तळला जात आहे ना याची खात्री करावी. तळलेला गोळा हलका लागला पाहिजे. अन्यथा त्यात किंचित सोडा घालून मिश्रण पुन्हा मळावे व गोळे करून तळून घ्यावेत. १ वाटी साखरेत पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा. म्हणजे पाक फार घट्ट होता कामा नये. पाक ढवळताना दोन बोटांमध्ये धरून बोटे लांबविली तर एक तार दिसते. हा एकतारी पाक.

सगळे गुलाबजाम तळून झाले की किंचित गरम पाकात घालावेत आणि मुरायला ठेवावेत. साधारण दोन तासात ते मुरतात. नंतर वरून त्यावर पिस्ता, बदामाचे काप घालावेत.

Leave a Comment