शाओमी देणार बंदीला आव्हान

xiaomi
मुंबई : एरिक्सन कंपनीने शाओमीने कंपनीने स्मार्टफोन निर्मिती करताना आपल्या पेटंटचे उल्लंघन केल्याचा दावा केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने फोनच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. आता शाओमीने स्मार्टफोनच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या देशातील बाजारपेठेत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शाओमी मोबाईल कंपनी दर आठवड्याला लाखाहून अधिक स्मार्टफोनची विक्रीच्या नवनव्या आकड्यांची नोंद करत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली तेव्हा शाओमी रेडमी वन एस आणि रेडमी नोटची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून करत होती.

कंपनीचे भारतातील प्रमुख मनु जैन यांनी भारतीय कायद्यातील तरतुदींचे १०० टक्के पालन करण्यावर शाओमीचा भर असल्याचे सांगितले. विक्रीवरील बंदीला आव्हान देण्यासंदर्भात कायदेशीर पावले उलण्याबाबत कंपनी सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले. एरिक्सनसोबत बोलणी करुन हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याची आपली तयारी असल्याचं जैन यांनी सांगितले.

स्मार्टफोन निर्मितीत शाओमी 3G आणि एज तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला. या कनेक्टिव्हिटी स्टँडर्डची अनेक पेटंट आपल्याकडे असल्याचा दावा एरिक्सनने केला आहे. शाओमीकडे या पेटंटवर आधारित निर्मिती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लायसन्स नाहीत किंवा ते रॉयल्टीही देत नसल्याने एरिक्सनने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार शाओमीच्या स्मार्टफोनवरील बंदी ५ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे, कारण त्या दिवशी या प्रकरणीवर पुन्हा सुनावणी होणार आहे.