राज्यभरात रब्बी पिकांचे वाजणार तीन-तेरा

rain
पुणेः शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्राला अगदी मोसमी वाटणार्‍या सर्वदूर पावसाने झोडपून काढले. राज्यात बहुतांश ठिकाणी गारांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या अवकाळी पावसाने राज्यभरात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून खरीप हंगामा पाठोपाठ आता रब्बी हंगामाचेही तीन-तेरा झाले आहेत.

हवामान खात्याने आगामी दोन दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात राज्यात थंडीचे आगमन झाले होते. आता राज्यभर पाऊस सक्रिय झाल्याने हवामानाच्या विचित्र स्थितीचा अनुभव सध्या येत आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी येणार्‍या वार्‍यांच्या प्रवाहांच्या संयोगामुळे सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात सर्वत्र पाऊस पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईशान्य मोसमी पाऊस सध्या दक्षिणेत सक्रिय असून या कालावधीत पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून वाहणार्‍या वार्‍यांच्या प्रवाहाची तीव्रता वाढली आहे. त्याच वेळी पश्चिमेकडूनही थंड वार्‍यांचा प्रवाह सक्रिय आहे. या दोन्हींच्या संयोगामुळे मध्य प्रदेशच्या दक्षिण भागापासून लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा महाराष्ट्रावरून जात असल्याने राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय आहे.

Leave a Comment