पोप फ्रान्सिसनी दलाई लामांची भेट नाकारली

francis
रोम – पोप फ्रान्सिस यांनी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट नाकारली असल्याचे वृत्त आहे. व्हेटीकनचे चीनशी असलेले नाजूक संबंध यामुळे ही भेट नाकारली गेल्याचे सांगितले जात आहे. नोबेल शांतीपुरस्कार विजेत्यांच्या भेटीसाठी दलाई लामा रोम मध्ये आले होते तेव्हा त्यांनी पोपच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. पोपच्या नकारामुळे निराश झाल्याची प्रतिक्रिया दलाई लामानी दिली आहे पण त्याचबरोबर या भेटीमुळे कुणाची अडचण होऊ नये अशीच आपली इच्छा असल्याचेही मत व्यक्त केले आहे.

दलाई लामा नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई यांना भेटण्यासाठी व त्यांच्या मुलाखतीसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार होते. मात्र त्यांना तेथील व्हिसा नाकारला गेल्याने ही भेट रोममध्ये ठरविण्यात आली होती. दलाई लामा यांनी २००६ साली पोप बेनेडीक्ट सहावे यांची भेट घेतली होती त्यानंतर ते कोणत्याही पोपला भेटलेले नाहीत.

व्हेटीकनला चीनबरोबरचे संबंध सुधारण्याची इच्छा आहे. चीनमध्ये रोमन कॅथॉलिक समाज दोन हिश्श्यात विभागला गेला आहे. एक कम्युनिस्ट वर्चस्वाखाली आहे तर दुसरा भूमिगत संघटनेच्या स्वरूपात असून हा गट पोपशी एकनिष्ठ आहे. कम्युनिस्टांच्या वर्चस्वाखालील समाजाला सरकारने मान्यता दिली आहे. चीनच्या दृष्टीने दलाई लामा हे बंडखोर आहेत व त्यांच्याशी जे विदेशी नेते बोलतात त्यांच्याविरोधात चीनकडून कडक प्रतिक्रिया दिली जाते व याच कारणाने पोप लामांनी भेटले नाहीत असे सांगितले जात आहे.

Leave a Comment