ठाकरे बंधुंनी मृत्यूपत्रासंबंधी वाद तडजोडीने मिटवावा

combo1
मुंबई – उच्च न्यायालयाचे न्या. गौतम पटेल यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रासंबंधी निर्माण झालेला वाद त्यांचे वारसदार उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांनी आपसांत तडजोडीने मिटवावा, असा सल्ला दिला. यावर पुढील सुनावणी बुधवारी होईल. शिवसेनाप्रमुखांच्या मृत्युपत्रानुसार जयदेव ठाकरे यांना त्यांच्या संपत्तीत वाटा मिळालेला नाही. उद्धव यांना मातोश्री बंगल्याचा बहुतांश भाग मिळाला आहे. त्यामुळे या मृत्युपत्राला जयदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले; तर मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठी उद्धव यांनी प्रोबेट याचिका सादर केली आहे. तिच्या सुनावणीत न्या. पटेल यांनी दोघा भावांना सहमतीने हा वाद मिटविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी सकाळी दोघांच्या वकिलांना तासभर वेळही दिला. अशी तडजोड केली तर ती दोघांच्याही हिताची ठरेल, असेही न्यायमूर्तींनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे प्रवासात असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे यावर येत्या बुधवारी दोघांचे वकील निवेदन करतील.

Leave a Comment