जायंट सर्च इंजिनवर भारताचा चुकीचा नकाशा

google
नवी दिल्ली – सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या पाहणीत गुगल त्यांच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर भारताचे वेगवेगळे आणि चुकीचे नकाशे दर्शवित असल्याचे निदर्शनास आले असून केंद्रीय माहिती व प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना अयोग्य नकाशा प्रदर्शनासंबंधित तक्रारी आल्यानंतर हे उघड झाल्याचे सांगितले.

सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या पाहणीत www.google.co.in (भारत), www.ditu.google.co.ch (चीन), www.google.pk (पाकिस्तान) आणि www.google.org (गुगलचे वैयक्तिक संकेतस्थळ) येथे वेगवेगळे अयोग्य, चुकीचे नकाशे असल्याचे आढळून आले आहे. चुकीचे नकाशे प्रदर्शित करणे हा भारतीय दंडविधान संहितामधील माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९-अ नुसार गुन्हा आहे, असे ते म्हणाले.

सर्व्हे ऑफ इंडियाने यासंदर्भात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, गृह आणि संरक्षण मंत्रालयाकडे १६ मे २०१३ रोजी पत्र पाठवून आवश्यक प्रतिबंधात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment