कर आणि वीज बिल न भरण्याचा शेतकरी संघटनेचा ठराव

raghunath-patil
पुणेः शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी उसाला प्रतिटनास साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे आणि हा दर घेतल्याशिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला असून यापुढे शेतकरी उसाचा कोणताही कर आणि वीज बिल भरणार नसल्याचा ठराव सुद्धा सभेमध्ये मंजूर करण्यात आला. शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप साखर आयुक्तालयात झाला.

आमदार, खासदारांना दिली जाणारी पेन्शन ही कर भरणार्‍या शेतकर्‍यांच्या पैशाची उधळपट्टी आहे. त्यामुळे शेतीवरचे सर्व कर माफ करा, साखरेला द्विस्तरीय किंमत पद्धत लागू केली पाहिजे. साखरेचा वीस टक्के वापर घरगुती होतो, तर उर्वरित ऐंशी टक्के साखरेची व्यापारी कामासाठी विक्री होते. व्यापारी साखर ५० रुपये किलो भावाने विक्री करायला हवी. दुष्काळी पॅकेजला आमचा विरोध आहे, असे पाटील म्हणाले. काँग्रेसने जे केले ते तुम्ही करू नका. निव्वळ पैसे देऊन प्रश्‍न सुटणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतीवरच्या योजनांची कपात करत आहे, असे निर्णय या सरकारला जड जातील, असा इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.

Leave a Comment