ऑस्ट्रेलियाची फिल ह्यूज्ला विजयी श्रद्धांजली

combo
अॅडलेड – ऑस्ट्रेलियाने भारतावर अॅडलेडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी मात केली असून भारताचा डाव ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३६४ धावांचा पाठलाग करताना ३१५ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय साजरा केला.

भारताला कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयची झुंजार खेळीही पराभूत होण्यापासून वाचवू शकली नाही. विराटने १७५ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४१ धावा केल्या. तर मुरली विजयचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. विजय नॅथन लायनच्या गोलंदाजीवर ९९ धावांवर बाद झाला.

त्यानंतर आलेल्या भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. तर पहिल्या डावात पाच गडी टिपणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथल लायनने दुसऱ्या डावातही सर्वाधिक सात गडी बाद केले. लायनने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताला अॅडलेड कसोटीत पंच इयान गाऊल्ड आणि मरायस इरॅस्मस यांच्या वादग्रस्त निर्णयांचा फटका बसला. गाऊल्ड आणि इरॅस्मस यांनी अनुक्रमे धवन आणि रहाणेला बाद ठरवण्याचा वादग्रस्त निर्णय दिला. पण रिप्लेत दोघांच्या बॅटला चेंडू लागला नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे धवन ९ धावांवर तर रहाणेला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले. पंचांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment