पुणे – हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई हा सध्या एका मुस्लिम तरूणाच्या हत्येप्रकरणी सध्या तुरूंगात असून त्याचा पुण्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (रविवार १४ डिसेंबर) ‘हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्याचे ठरवले आहे. कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे प्रमुख व वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राहिलेल्या प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सध्या धनजंय देसाई तुरूंगात असल्याने त्याची पत्नी रसिका देसाई हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे कळते.
हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईला ‘हिंदुत्व शौर्य पुरस्कार’
महापुरुषांबद्दल सात-आठ महिन्यापूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर पुण्यात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. याचदरम्यान नोकरीनिमित्त हडपसर, पुणे येथे राहणा-या मोहसीन शेख या तरूणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येला धनजंय देसाईला जबाबदार धरले होते. मोहसीन शेख हा सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत होता व त्याने महापुरुषांचा अवमान करणारे फोटो टाकल्याचा संशय देसाईच्या संघटनेला होता. त्यामुळे देसाईच्या संघटनेच्या टोळक्याने मोहसीनच्या हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी धनजंय देसाईसह सात जणांना तुरुंगात डांबले आहे. सर्व आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.