शिओमी हँडसेटवर भारतात बंदी

shiomi
दिल्ली – भारतात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या चिनी स्मार्टफोन कंपनी शिओमीच्या हँडसेट विक्रीवर दिल्ली उच्चन्यायालयाने बंदी घातली असून हे हँडसेट विकणार्‍या फ्लिपकार्टवरही ही बंदी लागू करण्यात आली आहे. एरिक्सन कंपनीने त्यांच्या आठ पेटंटचे उल्लंघन शिओमीने केले असल्यासंबंधीचा दावा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर ही बंदी घालण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत.

शिओमीने भारतात त्यांचे एमआय ३, रिडमी १ एस, रिडमी नोट असे स्मार्टफोन लाँच केले असून त्याची विक्री फ्लिपकार्टवर केली जात आहे. दरम्यान यासाठीचे तंत्रज्ञान एरिक्सनचे असून त्यांनी पेटंट घेतलेल्या आठ तंत्रज्ञानांचा वापर शिओमीकडून बेकायदा केला जात आहे. एरिक्सनने टेलिकम्युनिकेशन परवाना घेऊन या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची परवानगी दिली असूनही शिओमीने त्याचे उल्लंघन केल्याचे प्रतिज्ञापत्र एरिक्सने न्यायालयात दाखल केले आहे. त्यानुसार न्यायालयाने शिओमी तसेच फ्लिपकार्टवर हे फोन भारतात विकणे, असेंबल करणे, आयात व विक्री यावर बंदी घातली आहे. दरम्यान शिओमीने एम आय ४, एम आय ५ व स्मार्टवॉच लाँच करण्याची तयारी चालविली असल्याचेही समजते.

त्याचप्रमाणे शिओमीने आत्तापर्यंत किती युनिट विकली, त्यातून किती महसूल गोळा केला आणि त्यांची उपकरणे कुठे स्टोअर केली आहेत हे पाहण्याचे व ती सील करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून त्याची पाहणी करण्यासाठी सीन सदस्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. शिओमीने एरिक्सनची पेटंटेड टेक्नॉलॉजी बेकायदा वापरल्याने कंपनीच्या बौद्धिक संपदा हक्काचा भंग झाल्याचा तसेच एरिक्सनचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे .

शिओमी बरोबरच मायक्रोमॅक्स, जिओनी व इंटेक्स या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनाही याच कारणास्तव एरिक्सनने नोटिसा बजावल्या असून या फोनवरही भारतात बंदी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment