रशियाकडून भारत करणार हिरे खरेदी

diamond
दिल्ली – जगातील सर्वात मोठा हिरे उत्पादक देश रशिया आणि जगातील सर्वात मोठे हिरे कटिंग व पॉलिशचे उत्पादन केंद्र भारत यांच्यात महत्त्वपूर्ण करार नुकताच झाला असून भारतातील हिरे व्यवसायातील १२ कंपन्यांनी रशियातील अलरोझा मायनिंग कडून २.१ अब्ज डॉलर्स किमतीच्या हिरे खरेदीसाठी करार केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी नुकतेच जागतिक हिरे परिषदेचे उद्घाटन केले त्यावेळीच हे करार केले गेल्याचे समजते. या स्वरूपाचे १२ करार केले गेले आहेत.

जेम्स अॅन्ड ज्युवेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष विपुल शहा या संदर्भात माहिती देताना म्हणाले की भारतातील १२ कंपन्यांनी रशियन अलरोझा कंपनीशी तीन वर्षांसाठी हे करार केले आहेत. त्यानुसार ही कंपनी दरवर्षी ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या हिर्‍यांचा पुरवठा करणार आहे. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत दर महिन्याला ठरविली जाणार आहे. आजपर्यंत भारतीय कंपन्या कच्च्या हिर्‍यांच्या पुरवठ्यासाठी दुबई, अँटवर्प व बेल्जियमवर अवलंबून होत्या. आता रशियन कंपनीकडून हिरे मिळणार असल्याने या व्यवसायात तेजी येण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Comment