आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला होणार साजरा

yoga
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय योगदिवस साजरा केला जावा हे संपूर्ण जगाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन फलद्रुप झाले असून युनायटेड नेशन्सने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या पहिल्याच अमेरिका भेटीत मोदींनी भारतीय योगात जगाला एकत्र आणण्याची ताकद असल्याचे आणि आज जगातील अनेक नागरिकांनी योग हा रोजच्या आयुष्याचा एक भाग बनविल्याचे प्रतिपादन केले होते.

यूएन जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा करण्याची केलेली घोषणा हा भारतासाठी अभिमानाचा विषय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाला १७७ देशांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. नोव्हेंबर महिन्यात युरोपियन युनियनचे अध्यक्ष हरमन रोंपु यांनीही मोदींच्या या कल्पनेला पाठिबा दर्शविला होता. युनियनमधल्या २८ देशांनी त्याला संमती दिली होती.

मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते की भारतीय योग ही गेल्या ५ हजार वर्षांची जुनी परंपरा असून ती जगाला अमूल्य भेट आहे. ही प्राचीन परंपरा केवळ कसरत नाही तर त्यातून स्वतःचा, जगाचा, निसर्गाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होत असते. शारिरीक तसेच मानसिक व अध्यात्मिक उन्नतीसाठी योग महत्त्यपूर्ण आहे.

केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र खाते निर्माण केले असून श्रीपाद नाईक योग व परंपरागत औषध विभागाचे मंत्री आहेत.

Leave a Comment